लठ्ठपणाविरुद्धच्या लढ्यात ब्रिटनचा निर्णय - जंक फूडच्या जाहिराती ऑनलाइन दाखवता येणार नाहीत


माय वेब टीम  

हेल्थ डेस्क - वाढत्या लठ्ठपणाला नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय करूनही यश न आल्यामुळे ब्रिटन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २०२३ पासून ब्रिटनमध्ये जंक फूडच्या जाहिराती ऑनलाइन दाखवता येणार नाहीत. टीव्हीवरही त्यांचे प्रसारण रात्री ९ वाजेपूर्वी व सकाळी ५.३० वाजेपासून करता येणार नाही. लाइव्ह व ऑन डिमांड कार्यक्रमांतही अशा जाहिरातींवर बंदी असेल. पुढील वर्षी डिसेंबरपासून हे नियम लागू होण्यास सुरुवात होईल. ब्रिटनच्या आरोग्य व सामाजिक विभागाने गुरुवारी त्याची घोषणा केली. या निर्णयाचा चॉकलेट, बर्गर, कोल्ड्रिंक्स, केक, पिझ्झा व आइस्क्रीमच्या जाहिरातींना फटका बसेल. ब्रिटनमध्ये लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे.

वाढत्या कोरोना मृत्यूमागेही हे एक कारण आहे. यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या समस्येला प्राधान्य दिले. ते स्वत:ही कोरोनातून बालंबाल बचावले आहेत. त्यांनी रुग्णालयात असताना हे आव्हान स्वीकारले. एप्रिल २०२१ पासून जंक फूडवर एकावर एक फ्रीच्या ऑफर्सवर बंदीचा प्रस्ताव दिला होता. टीव्ही जाहिरातींवर बंदीचाही निर्णय तेव्हापासून मनात घोळत होता. या निर्णयांबाबत ब्रिटनच्या आरोग्यमंत्री जो चर्चिल म्हणाल्या, ‘किशोरवयीन व मुले जो कंटेंट पाहतात, त्याचा परिणाम त्यांनी निवडलेल्या पर्यायांवर पडतो.

यामुळे मुलांना हानिकारक जाहिरातींपासून वाचवणे ही आपली जबाबदारी आहे.’ ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या सीईओ कार्माइन ग्रिफिथनुसाार, ही बंदी मुलांना जंक फूडच्या जाहिरातींपासून वाचवण्याच्या दिशने साहसी व अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. ब्रिटनच्या ओबेसिटी हेल्थ अलायन्सच्या विश्लेषणात अशा जाहिरातींवर बंदीमुळे मुलांच्या खाण्यापिण्यातून १५ कोटी चॉकलेट व ४.१ कोटी चीजबर्गर हटवले जाऊ शकतात.

सध्या ब्रिटिश मुलांत सर्वाधिक लठ्ठपणा, त्यांच्या आरोग्याची जोखीम
ब्रिटनच्या एनएचएसनुसार, देशातील ६०% प्रौढ लोकसंख्या लठ्ठपणाने ग्रस्त आहे. तीनपैकी एक मूल प्राथमिक शाळा सोडताना खूपच लठ्ठ झालेले असते. सध्या ब्रिटिश मुलांत सर्वाधिक लठ्ठपणा अाहे. ११ वर्षांच्या पाचपैकी एक मूल अतिलठ्ठ आहे. देशात १.११ लाख मुले अति लठ्ठपणाच्या सावटात आहेत. त्यांना मधुमेह, हृदयविकार व पक्षाघाताची जोखीम अाहे. समस्येवर नियंत्रणासाठी २०१८ मध्ये शुगर टॅक्स लावला होता. रॉयल कॉलेज पीडियाट्रिक्सच्या तज्ज्ञांनुसार, आताही दैनंदिन गरजेची ७०% साखर नाष्ट्याच्या एका बाऊलमध्ये असते. त्यावर नियंत्रण अत्यंत गरजेचे आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post