काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला


 माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - पश्चिम बंगालनंतर आता उत्तर प्रदेश निवडणुकांचे वेध लागले असून, भाजपमध्ये 'इनकमिंग'ला तोंड फुटले आहे. काँग्रेसचे नेते जतीन प्रसाद यांनी भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ‘माझ्या तीन पिढ्या काँग्रेसमध्ये गेल्याने मी पक्ष सोडताना भरपूर विचार केला. भाजप हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. बाकी स्थानिक पक्ष आहेत,’ असे प्रसाद यांनी सांगितले. 

प्रसाद हे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा महत्त्वाचा चेहरा होते. हा प्रमुख नेता भाजपच्या गळाला लागल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस नेतृत्वात बदल करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. 

‘काँग्रेसमध्ये मला जाणवले की आपण राजकारणात आहोत. पण काहीच करू शकत नाही. जर तुम्ही तुमच्या लोकांच्या हितांचे रक्षण करू शकत नाहीत, त्यांची मदत करू शकत नाही,  राजकारणात राहून तुमचा काय फायदा? मी काँग्रेसमध्ये हे करू शकत नव्हतो. गेल्या तीन दशकांपासून मी काँग्रेससोबत होतो. आज मी विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. मी विचार करून या निर्णयाप्रत आलो की, गेल्या ८ ते १० वर्षांत खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष असेल, तर तो भाजपा आहे. बाकी पक्ष व्यक्तीकेंद्री आणि प्रादेशिक झाले आहेत. सध्या आपण ज्या परिस्थितीत आव्हानांचा सामना करत आहोत, तर त्यासाठी आज देशासाठी जर कुणी ठामपणे उभे आहेत, तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी.’

प्रसाद हे ब्राह्मण समाजाचे मोठे नेते होते. त्यांच्या पक्षांतराने काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.  प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदापासून ते पक्षीय कार्यप्रणालीपर्यंत बदल करण्यात यावेत, अशी मागणी पक्षातील एका गटाने केली होती. या जी-२३ गटाने जे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले होते त्यात प्रसाद यांचा समावेश होता. प्रसाद यांच्यावर पश्चिम बंगाल निवडणुकीची जबाबदारी होती. मात्र, तेथे काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. याची चर्चा सध्या पक्षीय पातळीवर सुरू होती. त्यात जी २३ गटात प्रसाद यांचा समावेश असल्याने त्यांचे पक्षनेतृत्वाशी फारसे पटत नव्हते. एकप्रकारे प्रसाद यांच्या पक्षांतराचा काँग्रेसला फटका मानला जात असला तरी काँग्रेसने त्यांना दार उघडून दिले नाही ना? अशीही चर्चा सुरू आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post