ढाकामध्ये भीषण स्फोट; सात ठार, ५० जखमी

 


माय वेब टीम 

ढाका: बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये झालेल्या स्फोटात सात जण ठार झाले आहेत. या घटनेत ५० हून अधिकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा स्फोट रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ढाकाती मोघबाजार वायरलेस गेटजवळील परिसरात झाला. स्फोटातील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, अधिक तपास सुरू आहे. स्फोटाची माहिती कळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि शेख हसीना नॅशनल बर्न अॅण्ड प्लास्टीक इन्स्टिट्यूट आणि स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

ढाका मेट्रोपॉलिटन पोलीस आयुक्त शफीकुल इस्लाम यांनी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली. त्यांनी म्हटले की, हा स्फोट दहशतवादी हल्ला की, बॉम्ब स्फोट आहे, याचे काही पुरावे सापडले नाहीत. गॅस गळतीमुळे स्फोट झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, स्फोटाच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

या स्फोटामुळे घटनास्थळाजवळील सात इमारती आणि तीन बसेसचे नुकसान झाले आहे. अग्निशमन सेवा आणि नागरिक सुरक्षा महासंचालक ब्रिगेडियर जनरल सज्जाद हुसैन यांनी म्हटले की हा स्फोट गॅस सिलेंडर अथवा गॅस पाइपमुळे झाला असण्याची शक्यता आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post