“एकदा म्हणता ‘उत्सव’, नंतर म्हणता ‘दुसरं युद्ध’…नेमकं काय आहे?”

माय अहमदनगर वेब टीम

दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ११ ते १४ एप्रिलदरम्यान करोना लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. देशात एकीकडे अनेक राज्य लसींचा साठा कमी असल्याची तक्रार करत असताना नरेंद्र मोदींनी उत्सव साजरा करण्याचं आवाहन केल्याने टीका होत आहे. त्यातच नरेंद्र मोदींनी रविवारी जनतेशी संवाद साधताना उत्सव ही दुसरी लढाई असल्याचा उल्लेख केला. दरम्यान काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी यावरुन टोला लगावला आहे.

पी चिदंबरम यांनी ट्विट करत लसीकरण मोहीम उत्सव आहे की युद्द अशी विचारणा केली आहे. यावेळी त्यांनी मोदींनी लॉकडाउन जाहीर करताना २१ दिवसांत युद्ध जिंकू अशी घोषणा केली होती, त्याचीही आठवण करुन दिली.

११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!

पी चिंदबरम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “एकदा सरकार म्हणतं की, लसीकरण मोहीम उत्सव आहे. दुसऱ्या दिवशी म्हणतं…दुसरं युद्ध आहे. नेमकं काय आहे?”. पुढे ते म्हणाले आहेत, “पंतप्रधानांनी पहिला लॉकडाउन जाहीर केला तेव्हा त्यांनी २१ दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता. यावेळी त्यांनी महाभारतातील युद्धाशी तुलना केली होती जे १८ दिवसांत जिंकलं होतं. त्याचं काय झालं?”.

‘लसीकरण उत्सव’ हे युद्धच- मोदी

“पोकळ अभिमान, वकृत्व आणि अतिशयोक्ती आपल्याला करोनाविरोधात जिंकण्यास मदत करणार नाही. सरकार लसींच्या पुरवठा आणि वाटपामधील आपलं मोठं अपयश लपवण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

मोदी काय म्हणाले – 

देशात करोनाप्रतिबंधासाठी ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान लसीकरण उत्सव आयोजित करण्यात आला असून ती लसीकरणाच्या विरोधातील दुसरी लढाई आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी विषाणूचा सामना करण्यासाठी नागरिकांना रविवारी अनेक सूचना केल्या. व्यक्तिगत सुरक्षा व सामाजिक आरोग्य यावर भर देण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

त्यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “लोकांनी चार गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. त्यात, प्रत्येकाने लस घ्यावी, प्रत्येक रुग्णावर उपचार व्हावेत, प्रत्येकाने कुणाला तरी वाचवावे. वयस्कर लोक व जे लोक जास्त शिकलेले नाहीत त्यांना लस घेण्यास मदत करा. ज्या लोकांकडे उपचारासाठी पैसे व माहिती यांचा अभाव आहे त्यांना मदत करा. मुखपट्टी परिधान करून स्वत:चे व इतरांचे जीव वाचवा. कुटुंबे व त्यातील सोसायटीच्या सदस्यांनी सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रे तयार करावीत. जेथे कुणी रुग्ण संसर्गित असेल तेथेच असे करावे. बाकी ठिकाणी नाही. त्यातून देशात रोगाशी लढा देणे सोपे जाईल कारण आपल्या देशाची लोकसंख्या जास्त आहे. सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्राबाबत जागरूकता राखण्याची गरज आहे. गरज नसताना घराबाहेर पडू नये. जे लशीसाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी. मुखपट्टी, साबणाने हात धुणे हे नियम पाळावेत. लस वाया जाता कामा नये”.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post