शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होणार? राष्ट्रवादीने दिलं 'हे' स्पष्टीकरण

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे  अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार  हे यूपीएचे अध्यक्ष  होतील, अशी चर्चा आज राजकीय वर्तुळात रंगली होती. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. शरद पवार यूपीएचे अध्यक्ष होण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. यातून राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर केलं. हा कित्ता केंद्रातही गिरवला जावा आणि भाजपला पुढील काळात सत्तेपासून दूर करावं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. यासाठी शरद पवार हे यूपीए अध्यक्ष होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. पण या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्णविराम दिला आहे.

शरद पवारांसंबंधी चर्चा निरर्थक 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष होतील, असं वृत्त माध्यमांमधून दिलं जात आहे. पण या मुद्द्यावर यूपीएतील मित्रपक्षांशी कुठलीही चर्चा झालेली नाही, असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपसे म्हणाले. माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या गेल्या आहेत. शेतकरी आंदोलनावरून जनतेचं लक्ष वेधण्यासाठी काही जणांकडून हेतूपुरस्सर अशा बातम्या पेरल्या जात आहेत, असं तपसे यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेची भूमिका

"राजकारणात काहीही घडू शकते. पुढे काय होईल माहित नाही. पण देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता शरद पवारांकडे आहे. त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांना देशातील प्रश्नांची जाण आहे आणि त्यांना जनतेची नाडी माहित आहे, असं सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांचा १२ डिसेंबरला ८० वा वाढदिवस आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post