मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी दिले 'हे' आश्वासन

 


माय अहमदनगर वेब टीम

सातारा: मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा येथे सांगितले.

शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीसाठी गुरुवारी सातारा येथे आले होते. या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तसेच काही संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींची भेट पवार यांनी घेतली. यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे ती उठवण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पवार यांच्याकडे करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

शरद पवार म्हणाले की, मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मी गेले अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यात वारंवार अडचणी येत आहेत. आता सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि ती स्थगिती उठविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र क्षीरसागर, बंडू कदम, ॲड. उमेश शेळके, संदीप पोळ आदी उपस्थित होते

उदयनराजे यांनी केला होता सवाल

मराठा आरक्षण प्रश्नी भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी वारंवार शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे, असे सांगत मंडल आयोगाच्या वेळी मराठा समाजाचा विचार का केला गेला नाही? त्यावेळी सत्तेत असलेल्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही?, असे प्रश्न काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी उपस्थित केले होते. सध्या सत्तेत असलेल्यांना मराठा आरक्षण प्रश्नाची सखोल माहिती आहे. ते मोठे लोक आहेत. त्यांनीच हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला होता. तुम्हाला किती दिवस 'मराठा स्ट्राँग मॅन' ही उपमा आम्ही द्यायची, असा टोलाही त्यांनी लगावला होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नव्याने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post