मराठा समाज आक्रमक; कोल्हापुरातून मुंबई, पुण्याचा दूध पुरवठा आज करणार बंद

माय अहमदनगर वेब टीम

कोल्हापूर - मराठा आरक्षण प्रश्नी पुढील निर्णय होईपर्यंत नोकर भरती थांबवण्याच्या मागणीकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करत पोलीस भरतीचा निर्णय घेतल्याने सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. या विरोधात आजपासून मुंबई आणि पुण्याला कोल्हापुरातून होणारा दुधाचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर यासंदर्भात पुढील आदेश होईपर्यंत राज्य सरकारने नोकर भरती थांबवावी, विद्यार्थ्यांना सध्या ज्या सवलती मिळतात त्या सुरू ठेवाव्यात, याबाबत तीन दिवसात निर्णय जाहीर करावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने चार दिवसांपूर्वी केली होती. बुधवारपर्यंत यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, उलट पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केला. यामुळे संतप्त झालेल्या सकल मराठा समाजाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

आज सकाळी नऊ वाजल्यापासून मुंबई आणि पुण्याकडे कोल्हापुरातून जाणारा दूध पुरवठा बंद करण्यात येणार आहे. आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने २३ सप्टेंबर रोजी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरात ही गोलमेज परिषद होत आहे. यामध्ये ५० हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दुसरीकडे खासदार उदनराजे भोसले मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झाले आहेत. त्यांनी दहा मागण्यांचं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post