कोल्हापूर - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवांधार पावसाने बुधवारी सकाळी पात्राबाहेर पडलेल्या पंचगंगेने अवघ्या सोळा तासांत इशारा पातळी गाठली. सकाळी सहा वाजता पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले. रात्री दहा वाजता पंचगंगा इशारा पातळीवर गेली. दिवसभरात पंचगंगेच्या पातळीत नऊ फुटांनी वाढ झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास पंचगंगा उद्या, गुरुवारी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. रात्री पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्याच्या पुढे आले.
दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. 102 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे. केर्ली ते जोतिबा हा मार्ग पुन्हा खचला असून, त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गगनबावडा तालुक्यात ढगफुटीसदृश तब्बल 317 मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरातही केवळ बारा तासांत तब्बल 99 मि.मी. पावसाची नोंद झाली. शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली येथे दुपारी जयंती नाल्याचे पाणी घुसले. मात्र, सायंकाळी ते ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
कोकणात जाणार्या तिन्ही मार्गांवर पाणी आले. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर तिसंगी, मांडुकली, मार्गेवाडी, कळे आणि मरळीजवळ पाणी आले. यामुळे यामार्गे जाणारी वाहतूक बंद होती. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर लव्हाळा येथे पाणी आल्याने तसेच कोल्हापूर-राधानगरी या मार्गावर कुरुकलीजवळ पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद राहिली. यासह 11 मार्गांवर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर तीन वाहनांत अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले. नद्यांची पाणी पातळी वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला. खबरदारीचा उपाय म्हणून ‘एनडीआरएफ’च्या आणखी दोन तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्वत्र धुवांधार पाऊस
जिल्हात आज दिवसभर सर्वदूर पाऊस होता. पावसाच्या संततधारेने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. दुपारपर्यंत धुवांधार पाऊस सुरू होता. त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला. शहर आणि परिसरात दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, सायंकाळनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला. शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज असल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 98 मि.मी. पाऊस झाला. गगनबावड्यात यावर्षीच्या आजअखेरच्या सर्वाधिक 317 मि.मी. म्हणजे सुमारे 13 इंच पावसाची नोंद झाली. 24 तासांत गगनबावड्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे गगनबावडा तालुक्यातील नद्या, नाल्यांना पूर आला आहे. गगनबावड्यासह चंदगड, आजरा, राधानगरी, कागल, पन्हाळा, भुदरगड व करवीर तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली. चंदगडमध्ये 155 मि.मी., आजर्यात 116 मि.मी., राधानगरीत 102.50 मि.मी., कागल तालुक्यात 90.29 मि.मी., पन्हाळ्यात 88.29 मि.मी., भुदरगडमध्ये 72.40 मि.मी., तर करवीर तालुक्यात 70.29 मि.मी.पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत 64 मि.मी., हातकणंगलेत 38.38 मि.मी., तर शिरोळ तालुक्यात 25.86 मि.मी. पाऊस झाला.
कोल्हापूर शहरात अतिवृष्टी
बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत कोल्हापूर शहरात अतिवृष्टीची नोंद झाली. बारा तासांत शहरात 99 मि.मी. पाऊस झाला. शहरातील अनेक भागात पाणी साचले. क्रांतिसिंहनगर, देवकर पाणंद, मुक्त सैनिक वसाहत, रामानंदनगर आदी परिसरात तर रस्त्यांनाच ओढ्याचे स्वरूप आले होते. शहराच्या प्रमुख ठिकाणी पाणी साचले होते. जोरदार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यातूनच कोल्हापूरकरांना ये-जा करावी लागत होती. कुंभार गल्ली, रामानंदनगर, मुक्त सैनिक वसाहत येथे नाल्यांचे पाणी नागरी वस्तीत घुसले. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. काही वेळानंतर मात्र पाणी पूर्ण ओसरले. कळंबा आणि रंकाळा तलाव आज दुपारी ओव्हर फ्लो झाले.
धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; नऊ धरणांत 200 मि.मी.पेक्षा जादा पाऊस
जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वच धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. नऊ धरणांत तर धुवांधार पाऊस झाला. घटप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल 336 मि.मी. पावसाची नोंद झाली. कुंभी धरण परिसरात 300 मि.मी. पाऊस झाला. राधानगरीत 281 मि.मी., तुळशीत 249 मि.मी., दूधगंगा धरण परिसरात 227 मि.मी., कासारीत 205 मि.मी. पाऊस झाला. चित्रीत 200 मि.मी., जांबरेत 269 मि.मी., तर कोदे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 269 मि.मी. पाऊस झाला. जंगमहट्टीत 190 मि.मी. पाऊस झाला. कडवीत 175 मि.मी., वारणा परिसरात 140 मि.मी., पाटगावात 105 मि.मी., तर चिकोत्रात 95 मि.मी. पाऊस झाला.
राधानगरी धरण 90 टक्के भरले
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोर
Post a Comment