चीनच्या हवाई तळावर अण्वस्त्रवाहू विमाने


माय अहमदनगर वेब टीम
लेह : वृत्तसंस्था

एकीकडे भारताला चर्चेच्या फेर्‍यात चीन अडकवून ठेवत आहे आणि दुसरीकडे ‘एलएसी’लगत युद्धाची सज्जताही पार पाडत आहे. चीनचे हे नापाक इरादे पुन्हा एकदा उघडकीला आले आहेत. उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांनी ड्रॅगनची पोलखोल केली आहे. चीनने भारतीय सीमेपासून जवळ असलेल्या काश्गर हवाई तळावर अणुबॉम्बने सज्ज असलेली अनेक लढाऊ विमाने तैनात ठेवलेली आहेत. ‘ओपन इंटेलिजन्स सोर्स डेस्ट्रेफा’ने ट्विटद्वारे ही छायाचित्रे जारी केल्याने खळबळ उडाली आहे.

काश्गर हवाई तळावर चीनचे सामरिक बॉम्बर आणि अन्य अत्याधुनिक तसेच घातक शस्त्रेही या उपग्रहीय छायाचित्रांतून स्पष्टपणे दिसत आहेत. काश्गर हवाई तळावर शियान एच-6 बॉम्बर तैनात आहेत. 6 पैकी दोन विमाने ‘पेलोड’ने सज्ज आहेत. पेलोडने सज्ज असणे म्हणजे बॉम्बने किंवा घातक अण्वस्त्रांनी सज्ज असणे होय. शिवाय, 12 शियान जेएच-7 लढाऊ बॉम्बर आहेत. यातील 2 पेलोडवर आहेत. 4 शेनयांग जे 11/16 लढाऊ विमानेही आहेत. या विमानांची मारक क्षमता 3 हजार 530 किलोमीटर आहे, तर काहींची 6 हजार किलोमीटर आहे.

चीनकडे याक्षणी 250 लढाऊ विमाने ताशी 2,500 किलोमीटर वेग असलेली आहेत. ही विमाने रशियाच्या  ‘एसयू 27 एसके’चीच सुधारित आवृत्ती आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हवाई हद्दीचे संरक्षण तसेच हवेतून जमिनीवर अचूक मारा करण्यात ही विमाने तरबेज आहेत. सामरिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, चीनला लडाख परिसरात आपल्या वायुसेनेची ताकद वाढवत न्यायची आहे.

मारक क्षमता अंतराच्या दहापट!

लडाखपासून काश्गर हवाई तळाचे अंतर 600 किलोमीटर आहे. त्यामुळे भारतासोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनने ही लष्करी शस्त्रास्त्रे तसेच लढाऊ बॉम्बर विमाने तैनात केलेली असण्याचा अंदाज बांधायला वाव आहे. ही बॉम्बर विमाने अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असणारी असून, त्यांची मारक क्षमता 6 हजार किलोमीटरपर्यंत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post