या अनुदानातून शिक्षकांना वगळले



माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘क’ व ‘ड’ श्रेणीतील कर्मचार्‍यांचा सेवा बजावत असताना दहा वर्ष सेवा होण्याच्या आत मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मात्र या लाभातून शिक्षकांना वगळण्यात आले आहेत.

राज्यात 2005 नंतर नव्या पेन्शन योजनेचा आरंभ करण्यात आला आहे. सध्या राज्य शासनाच्या अनेक कर्मचार्‍यांना परिभाषित अंशदायी पेन्शन योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत कर्मचार्‍यांच्या वेतनातून विशिष्ट रक्कम कपात करून शासन तितकीच रक्कम त्यात गुंतवत आहे.

त्या रकमेच्या काही भाग विविध समभागात गुंतवणूक करून त्याआधारे पेन्शन रक्कम दिली जाणार आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद अंतर्गत असलेले विविध विभागातील क व ड श्रेणीमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांनी दहा वर्षाच्या आत सेवा झाली असल्यास व सेवेत असताना संबंधित कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचार्‍यांच्या वारसाला दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहेत.

त्या सोबत त्याची कपात करण्यात आलेली रक्कम देखील संबंधित कर्मचार्‍यांच्या वारसाला देण्यात येणार आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचार्‍यांना या योजनेच्या लाभापासून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे खाते असणार्‍या कर्मचार्‍यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे. तथापि दुर्दैवाने त्या कर्मचार्‍याचे खाते उघडले गेले नसल्यास आणि दहा वर्षाच्या आत त्याचा मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचार्‍याला देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. कर्मचार्‍याने ज्यांना वारसदार म्हणून नेमले आहे त्यांना हा लाभ होईल. मात्र कर्मचार्‍यांनी वारसदारांची नियुक्ती केली नसल्यास जे कायदेशीर वारसत्व सिद्ध करतील त्यांना हा लाभ दिला जाणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post