महापालिकेत पुन्हा कर्मचाऱ्यांचे आंदोलनमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - तीन दिवस कामकाज बंद ठेवल्यानंतर गुरुवारी (दि. 16) महापालिकेचे कर्मचारी कार्यालयात आले. मात्र दुपारपर्यंत आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी न केल्याने संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारात पुन्हा ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौर बाबासाहेब वाकळे यांना हे समजताच त्यांनी महापालिकेत येऊन आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

महापालिकेतील एका अधिकार्‍यासह काही कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाल्याने भयभीत झालेल्या कर्मचार्‍यांनी गेले तीन दिवस काम बंद ठेवले होते. बुधवारी (दि. 15) महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार व कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांच्यासमवेत बैठक घेऊन कर्मचार्‍यांनी कामकाज सुरू करावे, त्यांची आरोग्य तपासणी तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून कर्मचारी कार्यालयात आले. मात्र दुपारपर्यंत वाट पाहूनही आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू झाली नव्हती. त्यामुळे कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी कर्मचार्‍यांसमवेत महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले.

याची माहिती महापौर वाकळे यांना समजताच त्यांनी महापालिकेत येऊन आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांसमोरच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. आरोग्य विभाग अशा पद्धतीने बेजबाबदारीने काम करणार असेल तर गंभीर विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच आयुक्तांनाही आरोग्य विभागाचा कारभार सुधारा, असा सल्ला दिला. त्यानंतर दुपारी उशिरा कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post