तातडीने जम्बो रुग्णालय उभारा ; यांनी दिले आदेश
माय अहमदनगर वेब टीम
पुणे - पुणे जिल्हयातील 'करोना' बाधित संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेवून तातडीने तीन ठिकाणी जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार बोलत होते. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी लागणार आहे. पुणे शहरासह जिल्हयातील ऑगस्ट अखेरची स्थिती विचारात घेत गतीने नियोजन करावे लागणार आहे.
करोना प्रतिबंधक उपाययोजना सोबतच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगतानाच करोना प्रतिबंधक तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच मंत्रालयस्तरावरील प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
दवाखान्यातून करोना उपचाराची मोठ्या रक्कमांची बिले आकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. खासगी रुग्णालयाचे बिल स्वतंत्र लेखा परीक्षकांच्या माध्यमातून तपासली जातील. शासनाच्या नियमानुसार उपचारांची दर आकारणी केली आहे का, याची शहानिशा करूनच रुग्णाला बिल दिले जावे, याबाबत सबंधित यंत्रणेने दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचनाही पवार यांनी दिल्या
प्रारंभी विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या सुविधा उभारणीबाबतचे प्रशासकीय पातळीवरील नियोजन गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी करोना उपचार व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळ तसेच संभाव्य स्थिती विचारात घेत करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. करोना संसर्ग रोखण्यासोबतच पुणे शहरासोबतच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment