शैक्षणिक शुल्कच्या नावाखाली पालकांची आर्थिक लूट



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- खाजगी शैक्षणिक संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया व ई लर्निंग शुल्कचा नावाखाली पालकांची आर्थिक लूट चालू असल्याचा आरोप करीत कोरोनाच्या संकटकाळात हा प्रकार त्वरीत थांबविण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, दादा दरेकर, विशाल म्हस्के, वैभव म्हस्के उपस्थित होते.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात होरपळत आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियासाठी प्रवेश शुल्क करताना कुठलीही मनमानी करू नये यासंदर्भात वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत. मात्र शहरात आणि जिल्ह्यात काही खाजगी शाळा, विद्यालय प्रवेश प्रक्रिया आणि ई-लर्निंगच्या नावाखाली अवाजवी शुल्क वसूल करून विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक अडवणूक करीत आहे. अशा संकटकाळात पैशांची अवाजवी मागणी केली जात असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून दुरावण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तरी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून प्रवेश प्रक्रिया व ई लर्निंग शुल्कचा नावाखाली पालकांची आर्थिक लूट थांबण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. शिक्षणाधिकारी काठमोरे यांनी अवाजवी शुल्क वसुली करणार्‍या शाळांना नोटीस बजावण्याचे आश्‍वासन दिले. तर प्रवेश प्रक्रियेच्या अवाजवी शुल्क संदर्भात पालकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन भांडवलकर यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post