'पाणी' टंचाई कोसो दूरमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -  उन्हाळ्याची चाहुल लागली असताना जिल्ह्याच्या धरणातील पाणीसाठा अतिसमाधानकारक राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा दुप्पटीने शिल्लक असून आता पाणीटंचाईसारख्या संकटास तोंड द्यावे लागणार नाही,अशी समाधानकारक स्थिती आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिकांसह पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही, असे असले तरी पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.

गत वर्षीच्या तुलनेत धरणांत यंदा दुप्पट पाणीसाठा उपलब्ध आहे. भंडारदरा धरणात गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 4 हजार 624 दशलक्ष घनफूट इतका होता. यंदा 10 हजार 708 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. मुळा धरणात 21 हजार 400 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा असून, गतवर्षी तो 8 हजार 836 दशलक्ष घनफूट इतका होता. या मोठ्या प्रकल्पांसह जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये यावेळी मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीटंचाई सध्या तरी कोसो दूर असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाने प्रारंभी दडी मारली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी खरीप पिकांची दुबार पेरणी करावी लागली होती. ऐन पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस आणि लाभक्षेत्र मात्र कोरडेठाक अशी परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होती. पाणलोटात भरमसाठ पाऊस झाल्यामुळे भंडारदरा, मुळा आणि निळवंडे ही तीन धरणे भरण्यास मदत झाली. जाता जाता परतीच्या पावसाने यंदा कहर केला. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली.


त्यामुळे नद्या, नाले, ओढे वाहताना दिसले. गत वर्षी गाव पातळीवरील पाझर तलाव व लहान तलाव भरले गेले नव्हते. यंदा मात्र बहुतांश गावांतील तलाव भरले गेले. त्यामुळे यंदाची भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे बहुतांश तालुक्‍यातील विहिरींना भरपूर पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन, रब्बी हंगामातील पिके जोमात डौलत आहेत.

गेल्या वर्षी (2018) मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील काही तालुक्‍यांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. जायकवाडी धरणात देखील निम्मेच भरले होते. त्यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे भंडारदरा, मुळा व निळवंडे आदी धरणांतील पाणीपातळी कमालीची खालावली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post