संगमनेरात पीक नुकसानीचे 10 कोटी 25 लाख जमा
माय अहमदनगर वेब टीम
संगमनेर - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व शेतकर्यांचे नेते ना. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने संगमनेर तालुक्यात झालेल्या शेतकर्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकर्यांना मदतीसाठी महसूल विभागाने 36 कोटींची मागणी केली असून पहिल्या टप्प्यात तालुक्यातील 24 हजार 498 शेतकर्यांसाठी 10 कोटी 25 लाख रुपये अनुदानाची रक्कम बँकेमार्फत शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने संगमनेर तालुक्यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये फळबागा सोयाबीन, मका, बाजरी यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीचा पाऊस सुरू असतानाच महाराष्ट्राचे नेते ना. बाळासाहेब थोरात यांनी निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर अगदी भाऊबीजेच्या दिवशी तळेगावसह तालुक्यात विविध भागांमध्ये शेतकर्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
यावेळी उपस्थित असलेल्या प्रशासनाला तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त मदत शेतकर्यांना मिळू देण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार महसूल प्रशासनाने संगमनेर तालुक्यात पंचनामे करून त्याचा अहवाल वरीष्ठांकडे पाठविला. शेतकर्यांना चांगली मदत मिळावी यासाठी महसूल विभागाने 36 कोटी रुपयांची मागणी केली असून यानुसार तालुक्यात पहिल्या टप्प्यात 24 हजार 498 शेतकर्यांसाठी 10 कोटी 25 लाख रुपये अनुदान मिळाले असून हे शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
उर्वरित अनुदान ही पुढील टप्प्यात मिळणार आहे. यामुळे अनेक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन पीक उभारणीसाठी या मोसमात अनुदान मिळालेले शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उर्वरित शेतकर्यांनाही लवकरात लवकर अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले, यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Post a Comment