पाच कोटींची बँक गॅरंटी भरा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कचरा व पर्यावरणाच्यादृष्टीने अत्यावश्यक असलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला प्रादेशिक प्रदूषण निर्मूलन महामंडळाकडे पाच कोटींची बँक गॅरंटी जमा करण्याचे आदेश गुरूवारी दि. 5 रोजी दिले आहेत. तसेच प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदतीही दिल्या आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाकडे कचरा डेपो, तेथे साचणार्‍या कचर्‍यावरील प्रक्रिया, मृत जनावरे यासंदर्भात तक्रारी गेलेल्या आहेत. त्यावर सातत्याने सुनावण्या होऊन लवादाने उपाययोजना सुचविल्या होत्या. मात्र महापालिकेकडून त्या पूर्ण झाल्या नाहीत.

यापूर्वी बायो मेथिनेशन प्रकल्प उभारण्यासाठी ऑक्टोबरपर्यंत मुदत देऊन त्यासाठी प्रदूषण निर्मूलन महामंडळाकडे एक कोटीची बँक गॅरंटी जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार बँक गॅरंटी जमा झाली, मात्र प्रकल्प पूर्ण न होऊ शकल्याने ती गॅरंटी जप्त करण्यात आली. आता पुन्हा पाच कोटींची बँक गॅरंटी जमा करण्यास सांगितली आहे.

यात दहा मेट्रिक टन क्षमतेचा बायो मेथिनेशन प्रकल्प एक महिन्यात, शंभर मेट्रीक टन खत प्रकल्प  28 फेब्रुवारी, मृत जनावरे नष्ट करण्यासाठी इन्सिलेटर प्रकल्प 28 फेब्रुवारी, बुरूडगाव येथील कचरा डेपोवर जुना कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीचा प्रकल्प 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या मुदती दिल्या आहेत. या मुदतीत प्रकल्प पुर्ण न झाल्यास पाच कोटींची बँक गॅरंटी जप्त करण्यात येणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post