आरोग्य व शिक्षण देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते -शिक्षणाधिकारी काठमोरे


रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या टीच कार्यशाळेस शिक्षकांचा प्रतिसाद
माय नगर वेब टीम
अहमदनगर - आरोग्य व शिक्षण देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. या दोन्ही गोष्टीशिवाय देश विकास करु शकत नाही. बदलत्या काळानुरुप शिक्षणातील नवीन तंत्रज्ञान, कौशल्याचे आत्मसात करण्याची गरज असल्याची भावना जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी व्यक्त केली.
नवीन शिक्षण पध्दतीचा अवलंब करीत सर्व सामान्य विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने महापालिकेसह शहरातील शालेय शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी काठमोरे बोलत होते. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष दादासाहेब करंजुले, रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, सचिव नंदिनी जग्गी, प्रकल्प प्रमुख डॉ.बिंदू शिरसाठ, सुशिला मोडक, प्रतिभा धूत, सुरेखा मनियार, शिलू मक्कर आदींसह रोटरीचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी काठमोरे पुढे म्हणाले की, मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी बौध्दिकते बरोबर भावनिक बुध्दीमत्तेला देखील महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमध्ये हे गुण फक्त शिक्षकच विकसित करु शकतात. अशा प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून ज्ञानाला चालना मिळत असल्याचे सांगून रोटरीच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर स्पर्धा परिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली बुध्दीमत्ता सिध्द करण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचे आवाहन त्यांनी केले.
भुईकोट किल्ला जवळील पंडित नेहरु हिंदी माध्यमिक विद्यालयात रोटरीच्या टीच उपक्रमांतर्गत शिक्षकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. किशोर मुनोत यांच्या हस्ते या कार्यशाळेचा शुभारंभ झाला होता. या प्रशिक्षण कार्यशाळेत शिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानयुक्त नवनवीन शिक्षण पध्दतीवर प्रविण पारधे, प्राचार्या स्वाती मुनोत, डॉ.प्रसाद उबाळे, बबीता जग्गी, जयंत ओहोळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस शिक्षकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.
दादासाहेब करंजुले यांनी पिढी घडविण्याचे कार्य करणार्‍या शिक्षकांनी बदलत्या काळानुरुप अपडेट राहणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण पध्दतीत देखील झपाट्याने बदल घडत आहे. हा बदल स्विकार न केल्यास आपण स्पर्धेतून बाहेर पडण्याची भिती आहे. नवीन शिक्षण पध्दतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असून, पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टीकल नॉलेजला अधिक महत्त्व आले असल्याचे त्यांनी सांगितले. जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सर्वगुण संपन्न सक्षम व सदृढ पिढी निर्माणासाठी रोटरी क्लब योगदान देत आहे. पिढी घडविण्याचे काम करणार्‍या शिक्षकांना बदलत्या काळानुरुप आधुनिक शिक्षण पध्दतीचा अवलंब करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे उज्वल भवितव्य नव्या पिढीच्या माध्यमातून शिक्षक घडविणार आहे. शिक्षक हे एका रस्त्याप्रमाणे असून स्वत: जागेवर राहून दुसर्‍यांना ध्येयापर्यंन्त पोहचवित असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत उत्कृष्ट शिक्षक म्हणून उन्मेश शिंदे (भिंगार हायस्कूल) व रुपाली काळे (आठरे पाटील पब्लिक स्कूल) यांना गौरविण्यात आले. बेस्ट ग्रुपचे प्रथम बक्षिस आठरे पाटील पब्लिक स्कूल, द्वितीय भिंगार हायस्कूल तर तृतीय पंचशील विद्या मंदिर यांना देण्यात आले. पाहुण्यांचा परिचय शेखर उंडे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिलू मक्कर यांनी केले. आभार नंदिनी जग्गी यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post