दातांचा पिवळेपणा असा करा दूर...


माय नगर वेब टीम -
दात असावेत तर मोत्यांसारखे सुंदर असे म्हटले जाते. चेहरा कितीही सुंदर असला, तरी दात जर अस्वच्छ, पिवळसर असतील तर त्यामुळे चेहऱ्याची शोभा कमी होते. दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी बाजारामध्ये अनेक टूथ पेस्ट, जेल इत्यादी उपलब्ध आहेत. पण यांच्या मध्ये असणाऱ्या रसायनांमुळे आपल्या दातांना किंवा हिरड्यांना नुकसान होऊ शकते. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत ज्यांच्यामुळे आपले दात मोत्यांसारखे शुभ्र होण्यास मदत मिळेल.
स्ट्रॉबेरीज् मध्ये असणारे मॅलिक अॅसिड दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करते. याच्याकरिता स्ट्रॉबेरीज् कुस्करून घेऊन ती पेस्ट दातांना हलक्या हाताने चोळून लावावी. हा उपाय काही दिवस चालू ठेवावा. थोड्याच दिवसांत दात पांढरे शुभ्र होऊ लागलेले दिसतील. तसेच, केळे खाल्ल्यानंतर केळ्याची साल टाकून न देता, सालीच्या आतील भाग दातांवर चोळावा. त्याने दात पांढरे होण्यास मदत मिळेल.
दातांचा पिवळेपणा कमी करण्याचा अजून एक उपाय असा की तुळशीची पाने तोडून ती उन्हात वाळवून घ्यावी. पाने वाळल्यानंतर त्यांची पूड करावी. ही पूड आपण ब्रश करताना, वापरत असलेल्या पेस्ट मध्ये मिसळून मग नेहमी प्रमाणेच दात घासावेत. लिंबाच्या रसाने ही दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मदत मिळते. जेवण झाल्यानंतर पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून त्या पाण्याने चुळा भराव्यात. त्यामुळे दात शुभ्र होण्यास मदत मिळेल.
दातांच्या बरोबरच हिरड्यांची ही योग्य काळजी घ्यावयास हवी. ब्रश केल्यानंतर हळूवार हाताने हिरड्यांनाही मसाज करावे. त्यामुळे हिरड्या मजबूत बनतील. आपल्या आहारामध्ये गोड पदार्थ, कोल्ड्रिंक्स या सारख्या पदार्थांवर नियंत्रण ठेवावे. सकाळी उठ्ल्यानंतर जसे आपण ब्रश करतो तसेच रात्री झोपण्याच्या अगोदरही ब्रश करण्याची सवय लावून घ्यावी. त्याचबरोबर दिवसभरातही काही खाल्ल्या-प्यायल्यानंतर चुळा भरण्याची सवय करून घ्यावी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post