खुनाचा प्रयत्न करणार्‍या 6 जणांना 3 वर्षाच्या कारावासासह दंडाची शिक्षा



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- मोटार सायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरुन सहा जणांनी शस्त्राने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केला. या गुन्ह्याच्या दाव्यात न्यायालयाने सहा जणांना तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

या खटल्याची माहिती अशी की, दि.26 ऑक्टोबर 2011 रोजी सावेडी येथील वृंदावन कॉलनी येथील मनोज सुखदेव राऊत यांची पुतणी शरयू राऊत ही रस्त्यावर फटाके वाजवत होती. त्यावेळी मोटारसायकल वरुन जाणार्‍या शुभम आदिनाथ गिरमे याने शरयुला धडक दिली. या धडकेत शरयू जखमी झाली तेव्हा मनोज राऊत याचा भाचा नरेन हा शुभम यास म्हणाला की गाडी चालविता येत नाही का? याचा राग येवून शुभम हा तेथून निघून गेला जाताना पाहून घेईन असे म्हणाला. त्यानंतर त्याने 6-7 जणांना मोटारसायकलवर घेऊन आणुन राऊत यांच्या घरात शिरुन लाकडी दांडके, गजाने मारहाण करुन घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले. नरेन भागवत याच्या डोक्यात बीअरची बाटली मारुन जखमी केले. प्रमोद राऊत यास हॉकीस्टिक व लाकडी दांडक्याने डोक्यावर खांद्यावर मारुन जखमी करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क. 307, 452, 143, 147 प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालय क्र.2 यांच्या समोर सुनावणी झाली. न्यायालयाने शुभम गिरमे, अक्षय सुरेंद्र अष्टेकर, हर्षद सुरेंद्र भापकर, अजिंक्य सुधाकर आंधळे, विकास मोहन बेरड, आशिष अरुण आडेप (सर्व रा.सावेडी) यांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

या सुनावणीत सरकार पक्षाच्यावतीने अॅड. विष्णुदास भोर्डे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल वळवी यांनी केला. तर पैरवी अधिकारी म्हणून हे.कॉ. एम. ए. थोरात यांनी काम पाहिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post