गणेशोत्सवापुर्वी शहरातील रस्त्यांचे पॅचिंग




माय नगर वेब टीम


अहमदनगर- पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असून त्यापुर्वी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गासह शहरातील सर्वच रस्त्यांचे पॅचिंग करण्यात येणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.






महापौर वाकळे यांच्यासह उपमहापौर सौ.मालनताई ढोणे यांनी शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची मंगळवारी (दि.13) पाहणी केली. यावेळी उपायुक्त प्रदीप पठारे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, अजय चितळे, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनचालकांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकांना अपघातही होत आहेत. अशा परिस्थितीत खड्ड्यांचे पॅचिंग करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.






लवकरच सार्वजनिक गणेशात्सव सुरु होणार आहे. त्यापाठोपाठ नवरात्रोत्सवही होणार आहे. गणेशोत्सवात नगर शहरातील विविध गणेश मंडळे आकर्षक देखावे सादर करत असतात. हे देखावे पाहण्यासाठी शहरच नव्हे तर संपुर्ण जिल्हाभरातून गणेशभक्त शहरात येत असतात. या काळात देखावे पाहण्यासाठी येणार्‍या गणेशभक्तांची गैरसोय होवू नये म्हणून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गासह शहरातील सर्वच रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅचिंग केले जाणार आहे. त्याबाबत सर्व कार्यालयीन सोपस्कार पुर्ण करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिलेले आहेत. लवकरच या पॅचिंगच्या कामास सुरुवात केली जाईल, शहरात कोणकोणत्या रस्त्यांवर खड्डे आहेत याचा सर्व्हे करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे महापौर वाकळे म्हणाले.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post