पुणे -
कोल्हापूर – सांगलीत आलेल्या महापूरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘शिवस्वराज्य’ यात्रा स्थगित केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुराबाबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, शासकीय पातळीवर सर्व मदत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून 50 लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार आहेत.
महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, तर कोल्हापूर व सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. आजवर अनेकवेळा संकटे आली, तेव्हा शासकीय यंत्रणांनी प्रभावीपणे काम केले होते, परंतु आताच्या परिस्थितीमध्ये शासकीय यंत्रणा दिसत नाही, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
‘जन आशीर्वाद’ यात्राही स्थगित
राज्यात कोल्हापूर – सांगलीत आलेल्या महापूरामुळे शिवसेनेने ‘जन आशीर्वाद’ यात्रा स्थगित केली आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. राज्यावर मोठी आपत्ती आली आहे. अनेक नागरिक पुरात अडकले आहेत. त्यामुळे सर्वचं पक्षांनी राजकीय यात्रा थांबवून मदतीचा हात पुढे केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप , सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मोर्चेबंधाणीसाठी यात्रा काढल्या होत्या. मात्र राज्यावर भीषण जलआपत्ती आल्याने तिन्ही यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत.

Post a Comment