सावेडी कचरा डेपोवरुन राष्ट्रवादी-शिवसेनेत गरमागरमी


आ. जगताप म्हणाले शिवसेनाच जबाबदार, उपनेते राठोड म्हणतात हे राष्ट्रवादीचेच पाप

माय नगर वेब टीम

अहमदनगर

सावेडी उपनगरातील कचरा डेपोवरुन शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये चांगले शाब्दिक युद्ध पेटले आहे. कचरा डेपोवरुन एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. कचरा डेपोचा दुसरा अध्याय सुरु झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत याचे तीव्र पडसाद उटण्याची चिन्हे आहेत. सावेडी उपनगरातील कचरा डेपोस शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप आ. संग्राम जगताप यांनी केला आहे. तर कचरा डेपोचे पाप हे राष्ट्रवादीचे असल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला आहे.

सावेडीतील कचरा डेपोमुळे नागरिकांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. नगरसेवक, नागरिकांनी वारंवार मागणी करुनही हटविला जात नाही. सावेडी उपनगरात स्थलांतरित केलेला हा कचरा डेपो नव्हताच तो कचरा निर्मिती खत प्रकल्प होता. शिवसेनेने त्याला कचरा डेपो बनविला आहे. या कचरा डेपोस सर्वस्वी शिवसेनाच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला. दरम्यान, नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. त्यामुळे कचरा डेपो तात्काळ हटवा अशी मागणी करत कचरा डेपो हटविण्याचे लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा आ. जगताप यांनी दिला होता. दरम्यान, मनपा आयुक्त यांनी आ. जगताप व आंदोलन कर्त्यांशी चर्चा करुन एक महिन्यात डेपोसाठी जागा पाहून कचरा डेपो स्थलांतरित केला जाईल असे लेखी आश्‍वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे, सागर बोरूडे, मीनाताई चव्हाण, दिपाली बारस्कर, शोभा बोरकर, सतीष बारस्कर, बाळासाहेब बारस्कर, बाबासाहेब गाडळकर, संभाजी पवार, निलेश बांगरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, राठोड यांनी कचरा डेपोस सुचक नगरसेवक कुमार वाकळे व अनुमोदक संपत बारस्कर आहेत. जनतेचा विरोध असतांना राष्ट्रवादीने कचरा डेपा सावेडीत आणला. आता तेच डेपो हटविण्यासाठी आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून हे पाप राष्ट्रवादीचेच असल्याचा आरोप उपनेते राठोड यांनी केला. यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, गिरीष जाधव उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post