माय नगर वेब टीम
मुंबई - आज देशभरात ईद-उल-फित्र (रमजान ईंद) साजरी केली जात आहे. जामा मशीदेचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मंगळवारी चंद्र दिसल्याचे जाहीर केले. त्यासोबतच देशभरात ईदची घोषणा करण्यात आली. इस्लामी कॅलेंडरनुसार रमजानचा महिना संपल्यानंतर ईद साजरी केली जाते. सऊदी अरबमध्ये काल (मंगळवारी) ईद साजरी करण्यात आली.
कोलकाता, वाराणसी आणि आसामसहीत देशभरातील अनेक ठिकाणी ईदचा चंद्र पाहिला गेला. त्यामुळे रमजानचा महिना संपला आहे. रमजान काळातील रोजे (उपवास) ठेवल्यानंतर हा सण साजरा केला जातो. यावर्षी रमजानचा महिना 7 मे रोजी सुरु झाला असून 4 जून रोजी संपला. यादरम्यान मुस्लीम बांधवांनी एकूण 29 रोजे ठेवले.
रमजान हा इस्लामी कालगणनेनुसार 9 वा महिना आहे. चंद्र दर्शनानंतर दिवस व महिना बदलल्याने शव्वाल महिन्याच्या (10 व्या महिन्याच्या) पहिल्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. ईदगाहमध्ये तसेच मशीदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात येते.
ईद-उल-फित्र हा मुस्लीम धर्मातील एक पवित्र सण आहे. जगभरात ईदचा चंद्र दिसल्यानंतर मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुस्लीम बांधव ईदगाहजवळ (कोणतीही स्वच्छ जागा) एकत्र जमून नमाज अदा करतात. नमाजनंतर सर्व बांधव एकमेकांना मिठी मारुन ईदच्या शुभेच्छा देतात.

Post a Comment