लोकसभा निकालाआधी राज्यात हालचालींना वेग; विरोधी पक्षनेते पदाचा आज फैसला



माय नगर वेब टीम

मुंबई, - महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील गटनेतेपदावरून राधाकृष्ण विखे पाटील यांना हटवल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर नियु्क्तीबाबत आज बैठक होत आहे. मुंबईत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या विधानसभा आमदारांची बैठक होणार आहे. गटनेता, विरोधी पक्ष नेते पदाचा फैसला आज होण्याची दाट शक्यता आहे.

गटनेतेपदी बाळासाहेब थोरात?


अहमदनगर येथील विखे यांचे काँग्रेस पक्षातील कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांना गटनेते जबाबदारी देण्याच्या हालचाली आहे. थोरात हे तब्बल पाचपेक्षा जास्त वेळा विजयी झालेले आमदार आहेत. तसंच राज्यात कृषी, शिक्षण, महसूल अशा खात्याचे मंत्री राहिले आहेत. विशेष म्हणजे थोरात यांना ताकद देत विखेंना शह देण्याची खेळी हायकमांड करू शकते. थोरात यांच्यावर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यांची प्रतिमा पक्षाला फायद्याची ठरेल. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही थोरात यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे गटनेतेपदासाठी थोरातांचं नाव चर्चेत आहे.




विखेंचा राजीनामा

नगरमध्ये मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळावं, यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. पण आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने सुजय यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर मग सुजय विखेंनी बंडाचा झेंडा उभारत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. पण काँग्रेसमध्ये राहूनही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र त्यांनी नगर आणि शेजारील शिर्डी मतदारसंघातही युतीच्या बाजूनेच आपली ताकद उभी केली. विखेंच्या या भूमिकेमुळे आता काँग्रेसनेही बाळासाहेब थोरातांना ताकद देण्याच्या दृष्टीकोनातून पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post