माय नगर वेब टीम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. सुनील तटकरे यांनी दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत यापूर्वी चर्चा झाली होती आणि १२ फेब्रुवारीला विलीनीकरण होणार होते, असा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यातच प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या रुग्णालयातील भेटीबाबत पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवारांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण
काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान १० नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटण्याबाबत दोघांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे तर्क लावले जाऊ लागले.
मात्र, या चर्चांवर आता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी रुग्णालयात विलीनीकरणासारख्या विषयावर चर्चा करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. त्या भेटीत विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘१० तारखेनंतर मुंबईत आल्यावर पुन्हा भेटू’
रुग्णालयातील संवादाचा संदर्भ स्पष्ट करताना पटेल म्हणाले की, ८ आणि ९ तारखेला आपण गोंदियात असणार असल्याची माहिती शरद पवार यांना होती. त्यामुळे १० तारखेनंतर मुंबईत परत आल्यानंतर पुन्हा भेटू, असे आपण त्यांना सांगितले होते.
रुग्णालयात असताना राजकीय चर्चा करणे आपल्यालाही योग्य वाटत नव्हते. शरद पवार यांच्याविषयी आपल्या मनात नेहमीच आदर राहील, असेही पटेल यांनी सांगितले.
‘साहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो’
शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मिळाली असून त्यांचे आशीर्वाद नेहमीच लाभले आहेत, असे पटेल म्हणाले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच आपण रुग्णालयात गेलो होतो. आता शरद पवार घरी आले असून दिवाळीनिमित्त त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत पूर्वी चर्चा झाल्याचा दावा केल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयातील भेटीचा संदर्भ स्पष्ट केला आहे. आता १० नोव्हेंबरनंतर पटेल आणि शरद पवार यांची पुन्हा भेट होते का, तसेच या भेटीत राजकीय चर्चा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment