माय नगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा ऐरणीवर आली आहे. शरद पवार रुग्णालयात असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली भेट, १० नोव्हेंबरनंतर मुंबईत पुन्हा भेटण्याचा झालेला संवाद आणि सुनील तटकरे यांनी विलिनीकरणाबाबत केलेले नवे विधान... या घटनांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठी घडामोड घडणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शरद पवार प्रकृती अस्वस्थतेमुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेतली. मात्र, प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? दोन्ही राष्ट्रवादींच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर काही खलबते झाली का? विशेष म्हणजे १० नोव्हेंबरनंतर मुंबईत पुन्हा भेटण्याचा संवाद झाल्याची माहिती समोर आल्याने विलिनीकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही १० नोव्हेंबरनंतरच्या संभाव्य भेटीला दुजोरा दिला आहे. मात्र, या भेटीला राजकीय रंग देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.
तटकरेंचा नवा खुलासा; आधी नकार, आता विलिनीकरणाची चर्चा!
या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विधानाने! दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चा यापूर्वी फेटाळून लावणाऱ्या तटकरे यांनी आता नवा खुलासा केला आहे. अजित पवार असते, तर ठरल्याप्रमाणे १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाले असते, असे विधान त्यांनी केले आहे.
तटकरे यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चांना नवे खाद्य मिळाले आहे. यापूर्वी विलिनीकरणाचा दावा फेटाळणारे नेते आता त्याबाबत ठरलेली तारीख आणि चर्चेचा संदर्भ देत आहेत. यावर शशिकांत शिंदे यांनीही प्रतिक्रिया देत, आधी आमची भूमिका फेटाळणाऱ्या तटकरे यांनीच आता सत्य समोर आणल्याचा टोला लगावला आहे.
पटेल-पवार भेटीचे संकेत की केवळ राजकीय औपचारिकता?
दरम्यान, शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना, ही भेट काहीतरी नवीन घडण्याचे संकेत देत असल्याचे सूचक विधान केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विलिनीकरणाच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांच्या विधानांमध्ये दिसणारा बदल, प्रफुल्ल पटेल यांची शरद पवारांशी झालेली भेट आणि १० नोव्हेंबरनंतरच्या संभाव्य चर्चेचे महत्त्व वाढले आहे.
आता खरा प्रश्न १० नोव्हेंबरनंतरचा!
शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना १० नोव्हेंबरनंतर भेटण्यास का सांगितले? सुनील तटकरे यांनी याच वेळी अजित पवारांची विलिनीकरणाबाबतची भूमिका का स्पष्ट केली? दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत का? अजित पवारांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही गटांच्या भविष्यातील वाटचालीबाबत नव्याने विचार सुरू झाला आहे का?
सध्या या प्रश्नांची अधिकृत उत्तरे समोर आलेली नाहीत. मात्र, १० नोव्हेंबरनंतर होणाऱ्या संभाव्य भेटीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार की विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा राजकीय चर्चेपुरतीच मर्यादित राहणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष!

Post a Comment