'गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा' ही प्रभावी ठरणार - प्रा. राम शिंदे
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ हा उपक्रम जलसंवर्धन, सांस्कृतिक वारसा आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम घडविणारा ठरणार असून या माध्यमातून पाणी व्यवस्थापनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प करण्यात आला, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ही यात्रा विविध भागात जाऊन जनसंवाद साधत व्यापक जनजागृती निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’ नियोजन बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे, अलका अहिरराव, रवी अनासपुरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पाणीसंवर्धन, तळ्यांचे नूतनीकरण, गावतळी निर्माण तसेच अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार अशा विविध माध्यमातून समाजासाठी भरीव कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि जलसंवर्धनाच्या कामांना उजाळा देण्यासाठी या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पाण्याचे महत्त्व पटवून देत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल. राज्यातील विविध नद्यांचे जल एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक या यात्रेतून साकार होईल.
दि. २५ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोदावरीच्या उगमस्थानातून जलकलश घेऊन यात्रेस प्रारंभ होईल. ही यात्रा नाशिक, सिन्नर मार्गे संगमनेर येथे पहिला मुक्काम करेल. त्यानंतर लोणी मार्गे शिर्डी येथे पोहोचेल. चौंडी येथून निघालेली यात्रा अहिल्यानगर येथे पहिला व शिर्डी येथे दुसरा मुक्काम करेल. तिसऱ्या दिवशी दोन्ही यात्रा एकत्र येऊन संभाजीनगरमार्गे घृष्णेश्वर येथे मुक्कामी राहतील. चौथ्या दिवशी कन्नड-चाळीसगाव मार्गे धुळे येथे मुक्काम होईल, तर पाचव्या म्हणजेच दि. २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारपर्यंत माहेश्वर येथे पोहोचून मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलकलशाच्या स्वीकारानंतर यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी दिली.
या संपूर्ण यात्रेत आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, या यात्रेत राज्यातील ३० प्रमुख नद्यांचे जलकलश शिर्डी येथे एकत्रित आणून पुढे माहेश्वर येथे विसर्जित करण्यात येणार आहेत. वारकरी संप्रदायाचाही सहभाग घेतला जाणार आहे. नागरिकांसाठी आवश्यक सर्व सुविधा व पार्किंग व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. शिर्डी येथे भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा' ही प्रभावी ठरणार - प्रा. राम शिंदे
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी 'गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६' ही प्रभावी ठरणार आहे. दि. २५ एप्रिल रोजी चौंडी येथून जलयात्रेला प्रारंभ होणार असून दुसरी जलयात्रा त्र्यंबकेश्वर येथून निघेल. चौंडी येथून निघणाऱ्या यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती व सीना नदीतील पवित्र जल घेऊन यात्रा मार्गस्थ होईल. ही ऐतिहासिक घटना असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत यात्रेचे नियोजन, मार्गक्रमण, जनसहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध विभागांच्या समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.


Post a Comment