मतदार संघाचा विकास फक्त भाजपच करू शकते - सुजय विखे पाटील
जेऊर येथे कार्यकर्ता बैठक संपन्न
माय नगर वेब टीम
नगर तालुका : राहुरी पाथर्डी नगर मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून विविध गावांनी बैठका, सभा, प्रचार फेऱ्या पार पडत आहेत. नगर तालुक्यातील जेऊर येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सुजय विखे यांनी सांगितले की, राहुरी मतदार संघात अक्षय कर्डिले याचा विजय निश्चित आहे. परंतु मतदारांनी गाफील न राहता राज्यात सर्वात जास्त मताधिक्याने अक्षयला विधानसभेत पाठवायचे आहे. मतदार संघाचा विकास हा फक्त आणि फक्त भाजपच करू शकतो. विकास कामांबद्दल आम्ही दिलेला शब्द कधीही बदलत नाही. साकळाई योजनेचा दिलेला शब्द पराभूत झाल्यानंतर देखील पूर्ण करून दाखवला. त्यासाठी तेराशे कोटी रुपये मंजूर केले. दिलेल्या शब्दाची किंमत तेराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. त्यामुळे एकदा शब्द दिला की तो पाळायचाच हा आमचा वारसा आहे.
स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मतदार संघाच्या विकासासाठी विविध कामे केलेली आहेत. सत्ता नसताना देखील विकास कामे करण्यात स्व. कर्डिले पटाईत होते. त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करून ठेवली आहे. कार्यकर्ते मोठे झाले तरच नेता मोठा होतो या विचारसरणीने कर्डिले यांनी कार्य केले. त्यांचा वारसा अक्षय निश्चितपणे पार पाडेल. त्यामुळे सर्वात जास्त मताधिक्याने अक्षयचा विजय होणे गरजेचे आहे.
अक्षय आजच आमदार झाला असून निवडणुक फक्त मोठ्या मताधिक्याने विजयासाठी सुरू आहे. वांबोरी चारी, विविध रस्ते, शेतकऱ्यांच्या समस्या, वीज अशा विविध प्रश्नांवर स्व. कर्डिले यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. तीच भूमिका यापुढे अक्षय कर्डिले सुरू ठेवतील. कोणतीही अडचण आल्यास माझे दरवाजे आपणासाठी २४ तास उघडे आहेत. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अक्षयच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सुजय विखे यांनी केले.
लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवावर भाष्य करताना विखे यांनी सांगितले की, घायल हूं इसीलिए घातक हूं ! पराभवानंतर अनेकांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. राहिलेल्यांचा देखील कार्यक्रम होणार आहे. स्व. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी पाडापाडीच्या राजकारणाला विशेष महत्त्व दिले होते. पदापेक्षा विश्वासाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे जनतेची साथ मिळत आहे. जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही असेही विखे यांनी सांगितले. मतदार संघात महापौर ज्योती गाडे, प्रियंका कर्डिले, शितल जगताप, पै. संदीप कर्डिले गावोगावी भेटी देऊन चौक सभा, प्रचार फेऱ्या, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. विकास कामांबाबत भूमिका मांडताना दिसून येतात. गावोगावचे कार्यकर्तेही प्रचारात सक्रिय झाले असून अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणातील चाणाक्ष !
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकारणातील चाणक्य व्यक्तिमत्व आहे. मी शरद पवार साहेबांना चाणाक्ष मानत नाही. संकटकाळात संयम महत्त्वाचा असतो हे फडणवीस यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा याबाबत तसेच विकास कामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच सकारात्मक असतात. फडणवीस राजकारणातील खरे चाणाक्ष नेतृत्व असल्याचे विखे यांनी सांगितले.
खासदार निलेश लंके यांच्यावर टीका !
विद्यमान खासदारा पेक्षा जास्त विकास कामे माजी खासदार करत आहे. विद्यमान खासदाराचे कामे दाखवा. त्यांचे फोटो नेहमीच सिस्पे घोटाळा, महिलेचा विनयभंग, कॅप्टन खरात अशा वादग्रस्त ठिकाणी दिसून येतो. जिथे वादग्रस्त काम तेथे खासदार हजर राहत असल्याची टीका विखे यांनी यावेळी खा. निलेश लंके यांचे नाव न घेता केली.



Post a Comment