माय नगर वेब टीम
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील सिंहगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी पुढाकार घेत, खासदार नीलेश लंके यांनी राज्यातील शिवप्रेमी, पुणेकर नागरिक आणि तरुणाईला रविवार दि. २३ रोजी एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. “गड-किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम” या उपक्रमाअंतर्गत या महिन्यात सिंहगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे खासदार लंके यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
१६ मार्च रोजी शिवनेरीपासून सुरू झालेल्या या मोहिमेने धर्मवीर गड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड आणि भुदरगड अशा विविध ऐतिहासिक किल्ल्यांना स्पर्श केला आहे. आता आठव्या टप्प्यात सिंहगडावर ही मोहीम आयोजित केली जात आहे. खासदार लंके यांनी गेल्या १० मार्च रोजी त्यांच्या वाढदिवशी हा उपक्रम जाहीर केला होता, ज्यात प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका गडावर जाऊन स्वच्छता, संवर्धन व सांस्कृतिक जागृतीचे कार्य करण्याचा संकल्प आहे.
“शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात कोणताही उपक्रम सुरू होत नाही. त्यांच्या आदर्शांवरच आपण आजही उभे आहोत. मात्र, त्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे गड दुर्दैवाने दुर्लक्षित आहेत,” असे सांगताना लंके यांनी गड-किल्ल्यांची जपणूक ही सगळ्यांची सामाईक जबाबदारी असल्याचे आवर्जून सांगितले.
ही मोहीम 'आपला मावळा' या बिगर राजकीय संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, प्रत्येक किल्ल्यावर मोहिमेत सहभागी होणाऱ्या मावळ्यांची संख्या वाढत असल्याचे समाधान लंके यांनी व्यक्त केले.
मोहिमेद्वारे गडाच्या ऐतिहासिक पायाभूत रचनांचे संवर्धन, कचऱ्याचा नायनाट, तसेच देशभक्तीचे संस्कार प्रसारित करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सिंहगडावर येत्या रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत सहभागी होऊन शिवप्रेमी नागरिकांनी ‘मावळा’ म्हणून आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. रविवारी सकाळी ७ वाजता गडाच्या पायथ्यापासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे.
राज्याच्या विविध भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेले विद्यार्थी, ग्रामीण भागातील शिव प्रेमी तसेच ट्रेकर्स ग्रुप्सच्या सदस्यांनीही मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आपला मावळा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
मोहिमेत मान्यवरांचा सहभाग
आजवर या मोहिमांमध्ये छत्रपती शाहू महाराज, आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हेमंत ओगले, जयश्री थोरात आदी मान्यवरांनी सक्रिय सहभागी होत स्वच्छता व संवर्धनास हातभार लावला आहे. विशेष बाब म्हणजे मोहिमेच्या आदल्या दिवशी खासदार नीलेश लंके यांनी प्रत्येक गडाच्या पायथ्याला जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुक्काम करून मोहिमेत सहभागी मावळ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

Post a Comment