७०वी वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : पहिल्या फेरीत भारतीय रेल्वे , गोवा , हरियाणा यांची पहिल्या फेरीत यशस्वी आगेकुच
गुजरातवर १७ गुणांनी मात करीत महाराष्ट्राची विजयी सलामी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महाराष्ट्रासह, गतविजेते भारतीय रेल्वे, गोवा, हरियाणा यांची "७०व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. आचार संहिता असल्याने या स्पर्धेचे उद्घाटन सलग दोन आशियाई कबड्डी स्पर्धा विजेता अर्जुन पुरस्कार प्राप्त अशोक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ठीक ६-० ०च्या ठोक्याला सामन्यांना सुरुवात झाली. पहिल्यांदाच कबड्डीच्या इतिहासात भाषण करण्याचे टाळण्यात आले. अहमदनगर, वाडिया पार्क येथील मॅट वर झालेल्या ब गटाच्या सामन्यात यजमान महाराष्ट्राने गुजरातला ४८-३१ असे पराभूत केले. पण त्याकरिता त्यांना पूर्वार्धात कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागले.
सामन्याच्या पहिल्याच चढाईत असलमने बोनस गुण घेत संघाचे खाते खोलले. पण गुजरातने पहिला लोण महाराष्ट्रावर देत १३-०९ अशी आघाडी घेतली. पूर्वार्धात असलम, आकाश व आदित्य या तिघांच्या अव्वल पकड झाल्याने महाराष्ट्रावर लोण देण्यात गुजरात यशस्वी झाले. पण पुन्हा एकदा महाराष्ट्राने कमबॅक करीत २१-१९ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात झटपट लोण देण्याच्या प्रयत्नात असलमची पुन्हा २ खेळाडूत पकड झाल्याने २१-२१ अशी बरोबरी झाली. पण यानंतर मात्र महाराष्ट्राने गुजरातवर २ लोण देत आघाडी घेतली. शेवटी १७ गुणांच्या फरकाने महाराष्ट्राने सामना जिंकला. आकाश शिंदे, आदित्य शिंदे यांच्या चढाया, तर मयूर कडमचा भक्कम बचाव यामुळे हे शक्य झाले. महाराष्ट्राने पूर्ण सामन्यात ९ बोनस गुण मिळविले. गुजरातला अवघा १ बोनस गुण घेता आला. असलमवर आज नेतृत्वाचे दडपण आल्या सारखे वाटत होते. अ गटात भारतीय रेल्वेने बीएसएनएलचा ४०-०७ असा धुव्वा उडविला. पहिल्या पाच मिनिटात लोण देत रेल्वेने १०-०० अशी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला. विश्रांतीला २४-०१ अशी आघाडी रेल्वेकडे होती. त्यानंतर औपचारिकता पूर्ण करीत आपला विजय साकारला. पंकज मोहिते, मितू शर्मा, शुभम शिंदे यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. या सामन्यात रेल्वेने ८, तर बीएसएनएलने ३ बोनस केले. अन्य सामन्यात क गटात गोव्याने बंगालचा ४६-१६ असा तर ड गटात हरियाणाने उत्तराखंडला ४२-२२ असे पराभूत केले.
Post a Comment