...म्हणून अंगणवाडी सेविकांनी परत केले सरकारनं दिलेले मोबाइल


 श्रीरामपूर | पोषण अभियन कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना (Anganwadi Workers) शासकीय कामांसाठी देण्यात आलेले मोबाईल (Mobile) तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट असल्याने त्याचा वापर करताना सेविकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामार्फत शासनाला मोबाईल परत करून आंदोलन केले.

यावेळी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके, अध्यक्षा कॉ. मदिना शेख, कॉ. जीवन सुरूडे, कॉ. शरद संसारे उपस्थित होते. मोबाईल निकृष्ट दर्जाचे असल्याचे निवेदन यावेळी बाल विकास विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी सी. व्ही. भारती, पर्यवेक्षिका एम. जी. राजळे, पी. बी. बडाख, सीमा विभूते यांना देण्यात आले.

यावेळी कॉ. बावके यांनी सांगितले, सन 2019 मध्ये सेविकांना देण्यात आलेल्या या मोबाईलची वाँरटी मे 2021 मध्येच संपली आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांनी दि. 17 ऑगस्टपासून आपापल्या प्रकल्प कार्यालयात जावून मोबाईल परत करण्याचे आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू केलेे आहे. शासनाने दिलेल्या मोबाईलचा वापर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा, गर्भवती माता, पोषण आहाराचे वाटप आदी माहिती भरण्यासाठी करतात. मात्र मोबाईलची क्षमता (रॅम) कमी असल्याने ते वारंवार हँग होतात. लवकर गरम होतात, त्यामुळे या मोबाईलवर सेविकांना काम करणे कठीण होते. सदर मोबाईलचा दर्जा निकृष्ट असल्याने दुरूस्तीचा खर्च सुमारे 3 ते 8 हजारापर्यंत होतो. शासन मोबाईल दुरूस्तीचा खर्च सेविकांकडूनच वसूल करतेे. निकृष्ट दर्जामुळे सध्या सेविकांकडील हजारो मोबाईल बिघडले आहेत. 3 हजारांपेक्षा जास्त मोबाईल बंद पडलेले असून जो पर्यत चांगल्या दर्जाचे मोबाईल शासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कॉ. बावके यांनी सांगितले.

युनियनच्या अध्यक्षा कॉ. मदिना शेख, कॉ. जीवन सुरूडे, कॉ. शरद संसारे, अंगणवाडी कर्मचारी रतनताई गोरे, इंदूबाई दुशिंग यांची यावेळी भाषणे झाली. याप्रसंगी रतन गोरे, शोभा विसपुते, निर्मला चांदेकर, मंगल निधाने, अश्‍विनी अभंग, अलका गायकवाड, अश्‍विनी कुलकर्णी, ताराबाई आसने, आशा बोधक, कडुबाई साळुंखे, मंदाकिनी शेळके, गीता रंधवणे, अरुणा डांगे, मंदा दळवी, बाळासाहेब चव्हाण आदींसह अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post