माय वेब टीम
मुंबई - सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी १५ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. सर्वांसाठी लोकल ट्रेनसाठी ३० जूनपर्यंत थांबा, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
मुंबई सध्या तिसऱ्या लेव्हलमध्ये (टप्पा) आहे. ज्यावेळी अनलॉकच्या पहिल्या लेव्हलमध्ये येईल त्यावेळी मुंबई लोकल सुरू केली जाईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी काल प्रसारमाध्यमांना दिली.
लोकल सेवा सर्वांसाठी कधी सुरू करण्यात येणार, असे विचारले असता, पहिल्या लेव्हलमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध उठवले जात आहेत. तशी कार्यवाही सरकारने सुरू केली आहे. मुंबई दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे संपूर्ण निर्बंध उठवण्यासह लोकल सर्वांना खुली करण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. इथली परिस्थिती सुधारली, तर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे वडेट्टीवार म्हणाले.
कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली तरी साथ पूर्णपणे गेलेली नाही. त्यामुळे लोकांनी जबाबदारीने वागावे. जबाबदारीनं वागल्यास कोरोना निर्बंध कमी होतील, असं देखील विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
राज्यातील निर्बंध (अनलॉक) टप्प्याटप्प्याने उठवण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना, वेगवेगळ्या स्तरावर आम्ही अनलॉक करत आहोत. पण सर्वांनी लक्षात ठेवावं की, कोरोना पूर्णपणे गेलेला नाही.
मास्क वापरा, सोशल डिस्टनिंग पाळा. आपला जिल्हा कुठल्या लेव्हलमध्ये ठेवायचा हे आता जनतेनं ठरवायचं आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. मुंबईत अजून लोकलबाबत निर्णय झालेला नाही. कारण मुंबई सध्या तिसऱ्या लेव्हलमध्ये आहे. तिथली परिस्थिती सुधारली, तर आम्हीही निर्णय घेऊ, असंही वडेट्टीवार म्हणाले.
Post a Comment