लालपरी परतीच्या वाटेवर; मुंबईकरांचा भार पुन्हा बेस्टवर


 मुंबई - लॉकडाऊनमध्ये मुंबईतील प्रवाशांसाठी धावून आलेली लालपरी अर्थात एसटी बसेस परतीच्या वाटेवर लागली आहे. एसटीची मुंबई सेवा काल (सोमवारी) संपुष्टात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेस्ट बसेसवर प्रवाशांचा भार पडणार आहे.

कोरोना काळात बेस्टच्या परिवहन उपक्रमातील सुमारे ३ हजार बस ताफ्यांच्या जोडीला एसटी महामंडळाकडून एक हजार बसचा ताफा सेवेत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्य़े सध्या सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहे. त्यामुळे त्यांना प्रवासासाठी बेस्ट सेवा एकमेव आधार ठरली आहे. निर्बंधांत शिथिलता आणली असल्याने सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यात अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू झालेली नसल्याने बसचाच आधार घ्यावा लागतो आहे.

मात्र महामंडळाने मुंबईकरांना नेमकी गरज असतानाच हा ताफा पुन्हा आपल्याकडे वळवून घेतला आहे. महामंडळाने रविवारी जाहीर केलेल्या निर्णयाचा पहिलाच फटका सोमवारी मुंबईकरांना बसला आहे.

एसटी महामंडळाने त्यांच्या एसटीचा ताफा बेस्ट सेवेतून मागे घेतल्याने मुंबईकरांचे पुरते हाल सुरू झाले आहेत.

सोमवारी सकाळपासूनच शहरातील अनेक बसथांब्यांवर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. निर्बंध शिथिलतेमध्ये कार्यालयात ५० टक्के उपस्थितीस अनुमती देण्यात आल्याने अनेकांना कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट सेवेचा आधार आहे. पण, बेस्टच्या बसमधील सुमारे ३ हजार बसची संख्या वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत अपुरी पडत आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post