लॉकडाऊन संपलाय पण कोरोना व्हायरस आहे, गाफील राहू नका- पंतप्रधान'कोरोना लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवणार'

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली-  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी मोदींनी जनतेला सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. यावेळी मोदींनी कबीर यांच्या ओळी म्हटल्या. ते म्हणाले की, 'पकी खेती देखिके, गरब किया किसान। अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान।'

मोदी पुढे म्हणाले की, कोरोना विरोधातील लढाई जनता कर्फ्यूपासून आजपर्यंत आपण खूप मोठा प्रवास केला आहे. वेळेनुसार आर्थिक गाडा हळु-हळू पुर्ववत येत आहे. आपल्यातील अनेकजण आयुष्य रुळावर आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सणासुदीच्या या काळात बाजारातही झगमगाट दिसत आहे. पण, आपल्याला हे विसरुन चालणार नाही की, लॉकडाउन संपला आहे, पण कोरोना व्हायरस आताही आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत प्रत्येक भारतीयांच्या प्रयत्नांमुळे भारत आज ज्या चांगल्या स्थितीत आहे त्या परिस्थितीला खराब होऊ देऊ नका.मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

मोदी पुढे म्हणाले की, आज देशात फॅटेलिटी रेट कमी आहे, रिकव्हरी रेट ज्यास्त आहे. अमेरिका आणि ब्राझीलसारख्या देशात 10 लाख लोकांमध्ये संक्रमितांचा आकडा 25 हजार आहे. भारतात 10 लाख लोकांमागे मृत्यू दर 83 आहे. अमेरिका, ब्राझील, ब्रिटेनसारख्या देशात हा आकडा 600 च्या पुढे आहे. समृद्ध देशांच्या तुलनेत भारताने आपल्या जास्त नागरिकांचा जीव वाचवला आहे.


देशात कोरोना रुग्णांसाठी 90 लाखांपेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत, तर 12 हजार क्वारंटाइन सेंटर्स आहेत. कोरोना टेस्टिंगसाठी 2 हजारांपेक्षा जास्त लॅब काम करत असून, यात लवकरच चाचण्यांची संख्या 10 कोटींच्या पुढे जाईल. कोविड महामारी विरोधातील लढाईत चाचण्यांची वाढती संख्या आपली मोठी ताकत आहे.


'सेवा परमो धर्म' या मंत्रावर चालताना आपल्या डॉक्टर,नर्स, हेल्थ वर्कर, सुरक्षा कर्मचारी निस्वार्थ भावनेने काम करत आहेत. या सर्वा प्रयत्नांमध्ये बेजबाबदारपणे वागण्याची आवश्यकता नाही. लॉकडाउन गेला म्हणजे कोरोना गेला असे नाही, कोरोना अजूनही आहे. आपल्या देशात याच्या व्हॅक्सीनवर काम सुरू आहे आणि लवकरच व्हॅक्सीन उपलब्ध होईल. तोपर्यंत गाफील राहू नका.


काही दिवसांपासून आपण पाहत आहो की, अनेकजण या परिस्थितीत नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. हे चांगले नाही. तुम्ही बेजबाबदारपणे वागाल, मास्क घालणार नाहीत, यामुळे तुम्ही तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचा जीव धोक्यात घालत आहात. अमेरिकेसह अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत होती, पण अचानक यात वाढ झाली. मित्रांनो संत कबीर दास यांनी म्हटले आहे की, 'पकी खेती देखि के गर्व किया किसान, अजहु जोला बहुत है, घर आवे तब जान।' म्हणजे अनेकवेळा आपण तयार झालेले पिक पाहून अतिआत्मविश्वासात जातो. पण, पिक घरात येत नाही, तोपर्यंत काम पूर्ण झाले, असे म्हणता येत नाही.


जोपर्यंत आपण पूर्णपणे यशस्वी होत नाही, तोपर्यंत बेजबाबदारपणे वागू नका. या महामारीची व्हॅक्सीन येईपर्यंत आपल्याला धीराने राहायचे आहे. अनेक वर्षानंतर आपण पाहत आहोत की, मानवतेला वाचवण्यासाठी संपूर्ण जग एकजुटीने काम करत आहे. आपल्या देशातील शास्त्रज्ञही या महामारीच्या व्हॅक्सीनवर पूर्ण ताकतीने काम करत आहेत.


कोरोना व्हॅक्सीन जेव्हा येईल, त्यानंतर लवकरात लवकर देशातील नागरिकांना देण्याचे काम सरकार करेल. रामचरित मानसमध्ये शिक्षाप्रद गोष्टी आणि इशारेदेखील आहेत. यात म्हटले आहे की, आग, शत्रु, पाप म्हणजेच चुकी आणि आजाराला कधीच कमी समजू नका. जोपर्यंत याचा संपूर्ण इलाज होत नाही, तोपर्यंत शांत बसू नका. त्यामुळे कोरोनावरील व्हॅक्सीन जोपर्यंत येत नाही,तोपर्यंत जबाबदारपणे वागा.


सणासुदीच्या काळात आपल्या आयुष्यात आनंद आणि उत्साह असतो. एका कठीण काळातून आपण पुढे जात आहोत. आयुष्यातील जबाबदाऱ्या पार पाडणे आणि सतर्क राहणे, अशा दोन्ही गोष्टी आपल्याला सोबत करायच्या आहेत. सुरक्षित अंतर, हात धुणे, मास्क घालणे, अशा नियमांचे पालन काटेकोरपणे करा.


आपण आणि आपल्या कुटुंबास सुरक्षित आणि आनंदी पहाण्याची ही सर्वांना नम्र इच्छा आहे. मला उत्साह आणि उत्साहाचे वातावरण हवे आहे. म्हणूनच मी प्रत्येक देशवासियांना वारंवार आग्रह करतो. मी माध्यमांना आणि सोशल मीडियालाला आवाहन करतो की तुमच्या माध्यमातून कोरोना जनजागृती करा. आपण सर्वांनी साथ द्या. देशवासीयांनो, निरोगी रहा, पुढे जा आणि एकत्रितपणे आपण देशाला पुढे नेऊ, नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, गुरु नानक जयंती, छठ आणि सर्व सण-उत्सवानिमित्त तुम्हाला हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post