लॉकडाऊन.. नुसती चर्चाच !



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याचे आव्हान मनपासमोर आहे. त्यावर विचारमंथन झाल्यानंतर शहर लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले. पण असा कोणताच निर्णय झालेला नाही. लॉकडाऊन संदर्भात काहींचे मत सकारात्मक आहे, तर काहींचा विरोध आहे. त्यामुळे त्यावर काय निर्णय घ्यायचा हे अजून निश्चित नसल्याची माहिती आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.

नगर शहरात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहता शहर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, अशी कुजबूज नगरकरात सुरू असतानाच सोशल मिडियावर मेसेज व्हायरल झाला. काल सोमवारी बैठक झाल्याचा संदर्भ त्यात देण्यात आला. या संदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठक झाल्याला दुजोरा दिल.

पण ती बैठक नव्हती तर केवळ चर्चा होती. या चर्चेत अनेकांनी सिटी लॉकडाऊन करण्याला होकार दिला. प्राथमिक चर्चा झाल्यानंतर आता त्या दृष्टीने पाऊल टाकण्यासाठी नियमानुसार बैठक बोलविली जाणार आहे. त्यात जो निर्णय होईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे वाकळे यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, करोनाचा प्रादूर्भाव वाढतो आहे. त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा विचार सुरू आहे. शहर लॉकडाऊन करण्याला काहींचा होकार आहे, तर काहींनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे यातून काय अन् कसा मार्ग काढायचा याचा निर्णय होणे बाकी आहे. सगळ्यांची बैठक घेऊन ज्या निर्णयावर एकमत होईल त्याची कार्यवाही केली जाईल, असे मायकलवार यांनी सांगितले.

पुणे, औरंगाबादप्रमाणेच नगरही लॉकडाऊन करा, अशी मागणी पुढे येत आहे. लॉकडाऊनचा निर्णय अचानक न घेता तो दोन दिवस अगोदर जाहीर करावा असाही एक मतप्रवाह पुढे आला आहे. काहींनी नगर लॉकडाऊन करावा यासाठी थेट सीएम कार्यालयात मेल धाडले आहेत. मात्र काहींचा विरोध असल्याने मनपा प्रशासन मात्र कात्रीत सापडले आहे.
नगर शहरात आजमितीला आठ ठिकाणी कंटेनमेंट झोन असून त्यातील तोफखाना व सिध्दार्थनगरची मुदत आज रात्री संपत आहे. या आठ झोनच्या आजूबाजूला बफर झोन आहे. त्यामुळे बहुतांशी सिटी लॉक झाल्यासारखीच आहे. कंटेनमेंटमध्ये अडकलेल्या लोकांना कोंडल्यागत झाले असून ते बंदी उठण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे महापालिका नेमका काय निर्णय घेणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post