घाटकोपरची तरुणी नगरमध्ये बाधित असल्याचे निष्पन्न



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मुंबईच्या घाटकोपर येथे राहत असलेल्या 30 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल गुरूवारी रात्री उशीरा प्राप्त झाले. त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यातील 30 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

करोना बाधित महिला आणि तिचा पती हे मुंबईत घाटकोपर येथे राहत असून प्रवासात जास्त त्रास जाणवू लागल्याने तिला नगर जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तिला सर्दी, ताप आणि खोकला याचा त्रास जाणवत होता. तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यात ती बाधित असल्याचे आढळले.

https://twitter.com/InfoAhmednagar/status/1260997213615910913?s=19

मात्र, तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो सध्या मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. घाटकोपर येथून त्यांना त्यांच्या मूळ गावी (पाथर्डी तालुक्यात) परतायचे होते. मात्र, वाटेत या महिलेला त्रास जाणवत होता. नगरमध्ये आल्यावर त्रास वाढल्याने संबधीत महिलेची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेतली आणि स्त्राव घेवून चाचणीसाठी पाठविण्यात आला. त्यात ती महिला बाधित असल्याचे आढळून आले. यापूर्वीही जिल्ह्यात बाहेरील जिल्ह्यातून आलेली व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले होते. तो बाधित रुग्ण आष्टी (जि. बीड) येथील होता. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालय आणि बूथ हॉस्पिटल मध्ये उपचार केले होते.

दरम्यान गुरूवारी रात्री उशीरा 19 व्यक्तींचे घशातील स्त्राव शुक्रवारी रात्री पुण्याला पाठविण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 60 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या असून त्यापैकी 40 व्यक्ती बर्‍या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर 4 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1 हजार 799 व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 694 स्त्राव निगेटिव्ह आले आहेत. सध्या 13 रुग्ण बूथ हॉस्पिटल मध्ये तर 3 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post