देशात आणखी दोन आठवडे लॉकडाउन ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समीक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता. त्यावेळी सर्व राज्यांकडून त्यांनी माहिती घेतली होती. तसंच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी विनंतीही केली होती. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत ३ मे पर्यंत वाढ करण्यात आली होती. आता दोन पुन्हा एकदा दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. ४ मेपासून पुढील दोन आठवडे हा लॉकडाउन लागू असणार आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून लॉकडाउनचा कालावधी वाढवणार असल्याची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त सवलती देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

रेड झोनमध्ये काय सुरु काय बंद?

सायकल रिक्षा, ऑटो रिक्षा, टॅक्सीवर बंदी

दोन जिल्ह्यांमध्ये होणारी बस वाहतूक बंद.

केशकर्तनालय दुकाने, स्पा बंद

रेड झोनमध्ये परवानगी घेऊन चारचाकीमध्ये दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा असेल.

अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता सर्व दुकाने रेड झोनमध्ये बंद राहतील. मात्र कॉलिनीमध्ये असणारी दुकाने उघडी ठेवणाची परवानगी आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post