स्वच्छता सर्वेक्षणात थ्री स्टार मिळविण्यासाठी द्विवेदी आग्रही




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – स्वच्छता सर्वेक्षणात थ्री स्टार आणि हागणदारीमुक्तमध्ये डबल प्लस मिळविण्याच्या उद्देशाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी कामाला लागले असून, त्यांनी बुधवारी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना यासाठी कामांच्या जबाबदारीचे वाटप केले.

स्वच्छता सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू असून, यामध्ये थ्री स्टार मिळाल्यास आणि संपूर्ण शहर हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेनेही मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. हागणदारीमुक्तीसाठी पहिल्या सर्वेक्षणात महापालिकेला प्लस गुणांकन मिळालेले आहे. आता ते डबल प्लस करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. यात यश आल्यास महापालिकेला मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे द्विवेदी यांनी आज यासाठी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येकाला कामांचे वाटप केले.

यामध्ये शहरातील कचरा संकलन शंभर टक्के होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी संबंधित ठेकेदार संस्थेस आवश्यकता वाटत असल्यास कचरा संकलनाची वाहने वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रत्येक वाहनावर जीपीएस प्रणाली बसविण्याचेही सांगितले. ओला आणि सुका कचर्‍याचे वर्गीकरण, प्लॅस्टिकचे रिसायकलिंग यासाठीही त्यांनी सूचना दिल्या. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठीचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी सांगितले. हागणदारीमुक्त अभियान राबविताना शहरातील नादुरूस्त असलेल्या शौचालयांची तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सायंकाळी उशीरापर्यंत ही बैठक सुरू होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post