राज्यात बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करा, अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी; पर्यावरणमंत्र्यांनी दिले ‘हे’ आश्वासन




माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शून्य प्रहरामध्ये बैलगाडी शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु केल्या पाहिजेत अशी मागणी यावेळी कोल्हे यांनी केली.
कोल्हे ज्या मतदारसंघातून येतात तो जुन्नर, आंबेगाव, शिरुर पट्ट्यामध्ये बैलगाडा शर्यती लोकप्रिय आहेत. त्यामुळेच हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी हा मुद्दा कोल्हे यांनी सभागृहासमोर मांडला. “शेतकरी त्यांच्या मुलांप्रमाणे बैलांवर प्रेम करतात. बैलगाडा शर्यती हा याच शेतकऱ्यांचा आवडता खेळ असल्याने त्यावर बंदी घालण्यात येऊ नये. देशी गाईंचा वंश टिकवून ठेवण्यासाठी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होणे गरजेचे आहे. या शर्यतींवर ग्रामीण भागामधील अर्थकारणही मोठ्याप्रमाणात अवलंबून असते,” अशी भूमिका कोल्हे यांनी मांडली.

सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर त्यांनी लगेचच केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन यासंदर्भातील माहिती त्यांना दिली. बैलगाडा शर्यती हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रश्न असल्याने त्याकडे विशेष लक्ष देण्याची विनंती कोल्हे यांनी जावडेकरांकडे केली. यासंदर्भात त्यांनी ट्विटवरुनही माहिती दिली आहे. “मंत्री जावडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील आठवड्यात आवश्यक ती माहिती घेऊन या संदर्भात पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले आहे,” असं कोल्हे यांनी ट्विटवरुन सांगितले आहे.




मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्येही कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा मांडला होता. त्यावेळेस बोलातना त्यांनी बैलगाडा शर्यतींच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना ग्रामीण भागांकडे आकर्षित करता येईल असं म्हटलं होतं. बैलांवरील अत्याचार रोखण्यासाठी २०१४ च्या मध्यात राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. बैलगाडा शर्यत बंदीला शेतकऱ्यांचा तसेच आयोजकांचा विरोध आहे.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post