कर्जत-जामखेडची हायहोल्टेज लढत : पवारांच्या तिसर्‍या पिढीचे आव्हान




माय नगर वेब टीम
अहमदनगर - कर्जत-जामखेड मतदारसंघाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. हा मतदारसंघ भाजपचे मंत्री राम शिंदे यांचे होमपिच. मात्र राज्यातील लक्षवेधी लढत म्हणून चर्चेचे कारण ठरले रोहित पवार. गेली पाच दशके राज्याच्या राजकारणावर प्रभाव असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते नातू. त्यामुळे येथील लढत जय-पराजय यापलिकडे ठरणार आहे. पवारांच्या तिसर्‍या पिढीचे राज्याच्या राजकारणातील आगमन कसे ठरणार, याचे भवितव्य ठरविणारी ही लढत आहे. पाच वर्षे मंत्रीपद असूनही मतदारसंघात घसरणारी लोकप्रियता सांभाळण्याचे आवाहन असलेल ना.शिंदे आणि राज्यातील आश्वासक चेहरा म्हणून पुढे सरकण्याच्या बेतात असलेले रोहित यांच्यातील ही लढत चांगलीच रंगणार आहे. ना.शिंदे यांनी ‘मीच शिकार करणार’ अशी राजकीय डरकाळी फोडली खरी पण मतदानाचा बाण मतदाराच्या हाती असल्याने ‘कोण शिकारी अन् कोण शिकार’ याचे उत्तर निकालच देणार आहे.

दोन टर्मपासून ना.शिंदे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. हॅट्रिक करणारा मतदारसंघ अशी कर्जत-जामखेडची ओळख आहे. २५ वर्षापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. १९८०, १९८५ आणि १९९० असे तीन टर्म हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. १९९५, १९९९ आणि २००४ या तीनही निवडणुकीत भाजपकडून सदाशिव लोखंडे यांनी विजय मिळवत हॅट्रिक केली. २००९ मध्ये राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि ते भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. २०१४ विरोधात मतांची विभागणी झाल्याने शिंदे यांना दुसरी संधी मिळाली.

राज्यात सत्ता येताच शिंदे यांना मंत्रिपद मिळाले. मंत्रिपद मिळाल्यानंतर शिंदे यांनी कर्जत आणि जामखेड दोन्ही तालुक्यात सरकारी निधीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज संस्था, बाजार समिती, नगरपरिषद ते ग्रामपंचायत अशा सत्ताकेंद्रांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी उडी घेतली आणि ना.शिंदेच्या एकतर्फी वाटचालीला आव्हान दिले.

रोहित पवार दोन वर्षापासून या मतदारसंघात राजकीय पेरणी करत आहेत. बेरोजगारी, दुष्काळ असे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालत त्यांनी मतदारसंघात समर्थकांचे जाळे विणले. त्यामुळे रोहित आज शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत. कुकडीचे पाणी शेतीसाठी मिळावे ही मतदारसंघाची 40 वर्ष जूनी मागणी आहे.दोन्ही तालुक्यात बेरोजगारांना हाताला काम मिळावे यासाठी औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे. यासाठी जागा असूनही ती कागदावर आहे. हे प्रलंबित प्रश्न लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील चर्चेच्या पुढे सरकले नाहीत. युवक व जनता आता जागृत झाल्याने या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना ८४ हजार ५८ मते मिळाली. राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके यांना ४६ हजार १६४ तर शिवसेनेचे रमेश खाडे यांना ४६ हजार २४२ मते मिळाली होती.

यंदा मात्र, शिंदे आणि पवार यांच्यात सरळ लढत आहे. यात कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यंदा विरोधी मतांची फाटाफूट होणार नाही, याची जाणीव झाल्याने शिंदेच्या गोटात आतापासूनच अस्वस्थता आहे. रोहित यांच्यासमोर शिंदे यांच्याविरोधातील नेते आणि मतदार एकत्र सांभाळण्याचे आव्हान आहे. रोहित हे पवार घराण्यातील तिसर्‍या पिढीतील राजकारणाी आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार यांच्या कुटूंबातील तिसर्‍या पिढीतील युवा नेतृत्व राजकीय पटलावर उदयासाठी आतूर आहे. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या लढतीत रोहित यांचे काय होणार, हा राज्यातील चर्चेचा विषय आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post