दहावीच्या परीक्षेत बसविला डमी विद्यार्थी



नगर : प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेत चक्क डमी विद्यार्थीच बसविल्याचा प्रकार समोर आला असून, कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे डमी बसलेल्या एका विद्यार्थ्याला शिक्षण विभागाच्या पथकाने पकडले. डमी बसलेल्या या विद्यार्थ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दहावीच्या परीक्षेला काल (दि. १) सुरुवात झाली. पहिला पेपर हा मराठी विषयाचा होता. कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील श्री रामराव कुंदे सर माध्यमिक विद्यालयात शिक्षण विभागाचे भरारी पथक गेले होते. त्यावेळी अक्षय अडसूळ हा १९ वर्षीय डमी विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या नावे परीक्षा देत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या डमी विद्यार्थ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मराठीच्या पेपरला कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने पकडले. पाथर्डी तालुक्यातील तनपुरेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कुल येथे ही कारवाई करण्यात आली. माध्यमिक शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या पथकाने कॉपी करणाऱ्या या विद्यार्थ्यांना पकडले.अनावश्यक नागरिकांनी परीक्षा केंद्राच्या परिसरात उपद्रव करू नये यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदी करण्यात आली आहे. दहावीचा गणिताचा पेपर ११ मार्च व १३ मार्च रोजी होणार असून, इंग्रजीचा पेपर ५ मार्च रोजी आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post